
शुक्रवार ता.१० मार्च २०२३ रोजी सायं.६ वाजता इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात त्रैभाषिक कवी संमेलन आयोजित केले आहे.(HUM ) ‘हम’अर्थात हिंदी,उर्दू,मराठी या तीन भाषांचे हे कवी संमेलन इचलकरंजी महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि दैनिक महासत्ता, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी एक्झिक्युटिव्ह, मनोरंजन मंडळ, क्रीडाई, उर्दू साहित्य अकॅडमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट ,टोमॅटो एफ.एम., फॉर्च्यून प्लाझा आदींच्या महत्वपूर्ण सहकार्याने हे कवी संमेलन होत आहे. ख्यातनाम हिंदी कवी राजेश रेड्डी हे कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत.यात सहभागी असलेल्या मान्यवर कवींचा संक्षिप्त परिचय पुढीलप्रमाणे…
“जाने कितनी उडान बाकी है,
इस परिंदे मे जान बाकी है…
जितनी बटनी बट चुकी ये जमीन
अब तो बस आसमान बाकी है….
असे लिहिणारे कवी राजेश रेड्डी हे हिंदी भाषेतील ख्यातनाम कवी आहेत. १९५२ साली जन्मलेले राजेशजी सध्या मुंबईत स्थायिक आहेत. विविध भारतीमध्ये केंद्र संचालक म्हणून ते कार्यरत होते. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेंवर त्यांचे प्रभुत्व आहे.त्यांचे उडान, आसमान से आगे, वजूद आदी गझल संग्रह रसिक प्रिय ठरलेले आहेत.जगजीत सिंग ,हरिहरन यासारख्या मातब्बर गायकांनी त्यांच्या गझलांना आवाज दिला आहे.त्यांच्या अनेक कविता पाठ्यपुस्तकांमध्येही समाविष्ट आहेत. कवी राजेश रेड्डी हे नाटककार म्हणूनही ओळखले जातात.एक था राजा, नेता कुर्सीप्रसाद ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. काही मालिकांचे गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. मानवी जीवनातील कारुण्याचे आणि अस्वस्थतेचे ते भाष्यकार आहेत.साध्या, सोप्या, सरळ शब्दांमध्ये ते लिहीत असतात.भारतासह जगातील अनेक देशात त्यांनी आपल्या कविता, गझला सादर केल्या आहेत. एक सशक्त हस्ताक्षर म्हणून त्यांचा मोठा लौकिक आहे.
“……वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे,
डोळे मिटून घे ,तल्लीन हो ,
काहीच जाणवलं नाही तर बाहेर पड, समुद्रावर ये ,
तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा ,वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का ?…
कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या कवितेतील या काही ओळी. एक कसदार अभिनेता आणि अव्वल कवी म्हणून या मराठी माणसाचा सर्व दूर परिचय आहे. मुंबई बालपण गेलेल्या व मुंबईतच राहणाऱ्या किशोर कदम यांनी मराठी, हिंदी ,तामिळ आदी भाषेतील अनेक चित्रपट, नाटक,दूरदर्शन मालिका यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचीअमीट छाप सोडलेली आहे. समर,जोगवा, फॅन्ड्री,नटरंग आदी अनेक चित्रपटांतील त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गारवा हा त्यांचा गीत संग्रहही अतिशय लोकप्रिय आहेत. तसेच जावे कवितांच्या गावा, बाऊल आदी काव्यसंग्रह रसिकमान्य आहेत.प्रेम,विरह,पाऊस,प्रवास,स्त्री जाणिवा आदी विषय त्यांच्या कवितेत समर्थपणे चितारलेले दिसतात.
खामोश लब है, झुकी है पलके, दिलों में उलफत नई नई है
अभी तकल्लूफ है गुफ्तगू मैं,अभी मुहब्बत नई नई है….
अभी न आयेंगी निंद तुमको, अभी न हमको सूकुं मिलेगा
अभी तो धडकेगा दिले ये जादा, अभी मुहब्बत नई नई है….
शबीना अदीब यांचे हे तुफान गाजलेले उर्दू शेर. उत्तर प्रदेशात कानपूर येथे आपले पती व कन्येसह त्या राहतात. गेल्या दोन दशकात उर्दू कवितेत त्यांनी मोठे स्थान मिळवले आहे. शबीना अदीब यांचे नाव माहीत नसेल असा उर्दू काव्य रसिक मिळणे अवघड.मधुर आवाज आणि अभिव्यक्तीची अनोखी शैली ही त्यांची बलस्थाने आहेत.वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्या कविता आणि गझल लिहितात. ऐन विशीत त्यांना कैफी आझमी यांच्यासारख्या बुजुर्ग शायराच्या अध्यक्षतेखालील मुशायऱ्यात गझल पेश केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या कविता,गझला सादर केल्या आहेत.’ तुम मेरे पास रहो ‘ हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह प्रचंड गाजला. त्यांच्या गझलेचे चाहते जगभर पसरले आहेत.लेखन,वाचन आणि प्रवास याची त्यांना विशेष आवड आहे.
……..भाषण के बाद कुछ कार्यकर्ता मंत्री जी के पास आये,
बोले सर, आपने दारूबंदी पर अच्छा भाषण दिया..
जनता का दिल जित लिया..
मंत्रीजी हसकर पीए से बोले
देखा, मै जनता की नस पकड लेता हुं
सच बात तो ये है कि,
पीकर भी अच्छा बोल लेता हुं…..
हास्य कवी म्हणून नामवंत असलेल्या मनोज मद्रासी यांच्या कवितेतील या ओळी. मनोज मद्रासी महाराष्ट्रात अमरावती येथे राहतात.ते झी टीव्ही हास्य कवी मुकाबलाचे विजेते आहेत.विविध चॅनेलवरील अनेक हास्य कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. देश विदेशातील अनेक कवी संमेलनात त्यांनी हास्य कवी म्हणून आपली छाप उमटविलेली आहे. समाज व्यवहारातलं व्यंग नेमकेपणाने पकडण्याची त्यांची शैली ,अंदाज अनोखा आहे. हसवत हसवत गंभीरपणे विचारायला त्यांची कविता भाग पाडते.

ये खंडहर होके भी आबाद रखी जाती है
दिल हवेली मे तेरी याद रखी जाती है…
हमसे दिवानोंको ही याद किया जाता है
जब कभी इश्क की बुनियाद रखी जाती है..
मश्वरा पहले गुलाबो से लिया जाता है
फिर तेरे सामने फरीयाद रखी जाती है…
सलीम चौहान यांचे हे शेर. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या गावी राहणारे सलिमजी नव्या पिढीतले उर्दू भाषेतील नामवंत कवी आहेत. अगदी लहान वयापासून भारतासह इतर काही देशांमध्ये त्यांनी कवी संमेलनात, मुशायऱ्यात सहभाग घेतलेला आहे.समाज जीवनातील नव्या जाणीव टिपण्याचे अनोखे कौशल्य त्यांच्या लेखणीत आहे. घटना घडामोडींकडे पाहण्याची, त्यावर विचार करण्याची आणि तो मांडण्याची त्यांची शैली अफलातून आहे.
कामाच्या बडग्यात आजवर जगणे राहून गेले
आयुष्याच्या मावळतीला हसणे राहून गेले..
हसऱ्या चेहऱ्याआड वेदना लपवित खोटे जगलो
अंती उमगले श्वास मोकळे घेणे राहून गेले..
या पंक्ती आहेत इचलकरंजी येथील गौरी पाटील या नामवंत नाट्य अभिनेत्री,गायिका, कवियित्री यांच्या.त्या संगीता अलंकार आहेत. विविध मान्यवर गुरूकडून संगीत शिकून आज त्या आग्रा घराण्याच्या डॉ. पौर्णिमा ताई धुमाळे यांच्याकडे तालीम घेत आहेत.संगीत ययाती आणि देवयानी ,संगीत स्वरसम्राज्ञी, संगीत हे बंध रेशमाचे आदि अनेक व्यावसायिक नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. त्यांनी काही चित्रपट व मालिकांमध्ये अभिनय तसेच गीतलेखन केलेले आहे.माझे आकाश वेगळे या व्यवसायिक संगीत नाटकाचे गीतलेखनही त्यांनी केलेले आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेली संगीत नाटके देश विदेशात सादर झालेली आहेत.
साक़ी तो मोहब्बत से दो घूँट पिलाएगा
लेकिन भरी महफ़िल में एहसान जताएगा ..
जिस हाथ के पत्थर ने औरों को किया ज़ख़्मी
पत्थर के कभी नीचे वो हाथ भी आएगा…
असे लिहिणारे इरफान शहानुरी इचलकरंजीचे आहेत.ते पेशाने उर्दूचे शिक्षक आहेत. उर्दू गझलकार आणि सूत्रसंचालक म्हणून त्यांचा मोठा लौकिक आहे. मानवी जीवनातील भावभावना अतिशय प्रगल्भपणे त्यांच्या शायरीत येत असतात. त्या प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांच्या हातखंडा आहे. देश विदेशातील अनेक मुशायरात त्यांचा शायर व सूत्रसंचालक म्हणून सहभाग राहिलेला आहे. मुशायरा उचलून धरण्याचे किंवा तो अधिक रंगतदार करण्याचे त्यांचे कौशल्य अफलातून आहे.त्यांची भाषेवर असलेली पकड जेवढी मजबूत आहे तेवढेच त्यांचे पाठांतरही अफलातून आहे. उर्दू गझलेतील हा कार्यकर्ता गझलकार आहे. कवितेच्या आणि गझ लेच्या प्रेमापोटी सातत्याने निरनिराळे उपक्रम राबवीत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. गझलेला आणि गझलकारांना रसिकांपर्यंत पोहोचविणे ही त्यांची केवळ आवड नव्हे तर जीवननिष्ठा आहे.
हृदये जोडत प्रेम घराशी होऊ शकते
माझे घरही मदिना – काशी होऊ शकते..
जमिनीवरती पडता पडता थेंब म्हणाला
माझी मैत्री पुन्हा नभाशी होऊ शकते..
भूक जाळता हवी यायला पाण्यासोबत
कारण येथे भूक अधाशी होऊ शकते….
असे लिहिणारे प्रसाद कुलकर्णी हेमराठीतील एक महत्वाचे गझलकार आहेत.ते समाजवादी प्रबोधिनी या संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.कवी,गझलकार,,लेखक, वक्ता ,संपादक, स्तंभ लेखक, पत्रलेखक अशी सर्वदूर ओळख आहे.त्यांची तीस हून अधिक पुस्तके पुस्तिका,तीन हजारावर लेख प्रकाशित आहेत. ते शालेय वयापासून काव्यलेखन करतात. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वयाच्या विशीत मराठी गझल लेखन सुरू केले. गझलांकित( २००४)गझलसाद ( २०१०),गझलानंद ( २०१४ )गझल प्रेमऋतूची ( गझलनंदा यांच्यासह ,२०२१ ) , आमची गझलसाद ( प्रतिनिधिक संग्रह २०२२ )हे संग्रह प्रकाशित.त्यांच्या यूट्यूब चॅनेल वर ‘ एक रविवार एक गझल ‘ या उपक्रमातील दीडशे गझलांसह इतर अनेक गझला – कविता, चित्कलायन या दीर्घ कवितेचे बारा भाग, तसेच कविता,गझल विषयक अनेक भाषणे पाहायला,ऐकायला मिळतात.तर त्यांच्या ब्लॉगवर शेकडो लेख वाचायला मिळतात.
————————————————
यावर आपले मत नोंदवा