प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
दैनिक सकाळच्या इचलकरंजी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘ संस्कृती ‘ही पुरवणी शनिवार ता. ५ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झाली त्यातील लेख
—–——————
प्रत्येक शहराला एक संस्कृती असते.अर्थातच ती एकूण व्यापक भारतीय संस्कृतीचाच एक घटक असते. अनेकदा ही संस्कृती विविधतेच्या मिश्रणातून तयार होत असते. दै. सकाळ च्या वतीने आज ‘संस्कृती पुरवणी ‘ सादर केली जात आहे ही फार चांगली बाब आहे .याबद्दल सकाळ परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन. या निमित्ताने आपण इचलकरंजीतील कामगार चळवळ व तिची संस्कृती या अंगाने थोडा विचार करणार आहोत.
इचलकरंजीची ओळख वस्त्रनगरी, महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी गेल्या सात दशकांपासूनची आहे. यंत्रमाग व्यवसायाला शंभरावर वर्षाचा इतिहास आहे.वस्त्रोद्योगासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीत दीड लाखावर साध्या ते अत्याधुनिक यंत्रमागआहेत. इचलकरंजी आणि आसपासच्या वीस-पंचवीस किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या या वस्त्रोद्योगातून दररोज अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असते.या माध्यमातून इचलकरंजीत दररोज लाखो मीटर सर्व प्रकारचे कापड तयार होत असते. सूतगिरणी, प्रोसेसिंग, गारमेंट अशा अनेक मण्यांच्या माळेत हा व्यवसाय गुंफलेला आहे.शहराचे अर्थकारण संपूर्णपणे याच व्यवसायाभोवती फिरत असते.यंत्रमाग धारक संघटना, कामगार संघटना, व्यापारी संघटना ,खर्चीवाले, हमाल, ट्रान्सपोर्ट हे सर्व एकमेकावर अवलंबून असलेले घटक आहेत.
या शहराने यंत्रमाग कामगारांपासून सायझिंग कामगारांपर्यंत सर्व प्रकारचे अल्पकालीन – दीर्घकालीन लढे अनुभवलेले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाच्या कालखंडाने विविध क्षेत्रांवर परिणाम झाला तसाच परिणाम यंत्रमाग व्यवसायावरही झाला आहे. हे नाकारून चालणार नाही.हे शहर कामगार आणि मालक या दोन वर्गात प्रामुख्याने विभागले गेलेले आहे. अन्य संघटित – असंघटित क्षेत्रातील नोकरदारांची,कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. या शहरात कामगारांचे मालक झाले आहेत आणि मालकाचेही कामगार झालेली उदाहरणे आहेत.एकूण काय इचलकरंजी शहर श्रमसंस्कृतीचे शहर आहे.

संघटना म्हंटली की पक्ष व पक्षीय विचारधारा आली.या शहरात आज यंत्रमाग कामगारांच्या लालबावट्यापासून इंटकपर्यंत आणि कामगार सेनेपासून मनसे कामगार सेनेपर्यंत विविध पक्षांच्या कामगार संघटना आहेत.इचलकरंजीच्या श्रमसंस्कृतीचा इतिहास पाहता या कामगार संघटनांच्या वाटचालीचा नव्वद टक्क्यांहून अधिक वाटा डाव्या चळवळींचा राहिलेला आहे. त्यांनी कामगार चळवळीचे मध्यवर्ती नेतृत्व केलेले आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेकदा कठोर संघर्ष होऊनही इथली व्यवसायिक संस्कृती एकोप्याची राहिली आहे यात शंका नाही .यामध्ये डाव्या कामगार चळवळीच्या नेतृत्वाचे योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे.
यंत्रमाग व्यवसायाप्रमाणेच इथल्या डाव्या राजकारणालाही सात दशकांची परंपरा आहे .कॉम्रेड एस.पी. पाटील १९५५ सालापासून या परिसरात कम्युनिस्ट पक्षाची बांधणी करत होते. याच काळात सांगलीहुन येऊन-जाऊन कॉ.शांताराम गरुड हे कार्यकर्त्यांना वैचारिक दृष्ट्या तयार करत होते.१९६५ ते १९७७ ही बारा वर्षे कॉ.एस.पी.पाटील व कॉम्रेड शांताराम गरुड यांनी या परिसरात डावा विचार रुजवण्याचे व कामगारांना संघटित करण्याचे मोठे काम केले. सत्तरच्या दशकात कॉ.के.एल.मलाबादे नगरपालिकेतील नोकरी सोडून देऊन कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यानंतर माकप, भाकप ,काँग्रेस, जनता दल,भाजप, शिवसेना,लाल निशाण, मनसे, रिपब्लिकन अशा अनेक पक्षांच्या कामगार नेत्यांनी इथे कामगार चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न केला. आणि श्रमसंस्कृतीला एक व्यापक आयाम निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला व तो आजही चालू आहे.
१९५७ साली हातकणंगले मतदारसंघातून लाल निशाण पक्षाचे कॉ.संतराम पाटील विधानसभावर निवडून गेले होते.१९७८ साली इचलकरंजीतुन कॉम्रेड एस.पी. पाटील निवडून गेले होते. तर १९९० साली कॉम्रेड के.एल.मलाबादे विधानसभेवर निवडून गेलेले होते. मलाबादे दोन वर्षे नगराध्यक्षही होते. नगराध्यक्ष म्हणून आणि आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख इचलकरंजीत आज तीन दशकांनंतरही आदराने केला जातो. हे सारे खरे असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणात डाव्यांना फारसे यश आलेले नाही. १९८५ साली एकदा सहा नगरसेवक निवडून आणण्याची केलेली किमया पुन्हा डाव्यांना करता आली नाही. एरवी पाच-दहा हजार कामगारांचे मोर्चे काढणारे नेते अपवाद वगळता निवडणुकीच्या राजकारणात अनामत ही वाचू शकले नाहीत हे वास्तव आहे.याचे कारण श्रम संस्कृतीची मूल्यव्यवस्था रुजविण्यातील कमजोरीत आहे.याच्या प्रबोधनाच्या अभावात आहे.अर्थात त्यामुळे इथली कामगार चळवळ कमजोर झाली असे अनुमान काढता येत नाही. कारण ही मंडळी कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या चळवळी परिणामांची तमा न बाळगता करत असतात.
इचलकरंजीतील कामगार संघटनांनी ‘इथला उद्योग वाचला पाहिजे आणि कामगारही सन्मानाने जगला पाहिजे ‘ हे ब्रिद ठेवून आंदोलने केलेली आहेत. कधी काळी फक्त यंत्रमाग कामगारांच्या प्रश्न प्रश्नात लक्ष घालणारी डावी चळवळ आज सायझिंग कामगारांपासून बांधकाम कामगारांपर्यंत आणि छोटे व्यापारी ,खोकी धारक, फेरीवाले, अंगणवाडी सेविका, पूरग्रस्त आदी विविध संघटनांची बांधणी करताना दिसतात. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात.त्याचा लाभ कष्टकरी वर्गाला होतो आहे हे कामगार चळवळीचे न दिसून येणारे पण मोठे यश आहे. हे कामगार संस्कृतीचा विचार करत असताना ध्यानात घ्यावेच लागेल.
यानिमित्ताने एक बाब लक्षात घ्यावी लागेल कोणताही राजकीय विचार असो ,तत्त्वज्ञान असो त्यावर आधारित कार्यकर्ते तयार करण्यासाठी पूर्वी पक्षिय शिबिरे होत असत. त्यातून कार्यकर्ते घडत असत.आज कामगार संघटनांची अशी शिबिरे होताना दिसत नाहीत.त्यामुळे विचारावर आधारित नवे कार्यकर्ते तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली आहे. हे उद्याच्या काळात श्रमसंस्कृती वरील एक मोठे आरिष्ट ठरणार आहे.किंबहुना आजही ते अरिष्ट घोंघावत आहेच. कारण एकीकडे भांडवलशाही व नवभांडवलशाही व्यवस्थेमध्ये कामगारांचे कायदेशीर व न्याय हक्क डावलले जात आहेत. कामगार कायदे पातळ केले जात आहेत.त्यांना अर्थहीन बनवले जात आहे. मात्र त्याबाबतची टोकदार जाणीव कामगारांमध्ये निर्माण करण्यात कामगार नेतृत्व पुरेसे यशस्वी ठरताना दिसत नाही.हे श्रमसंस्कृती वरील अरिष्ट दुर्लक्षित करता येत नाही.
‘जगातील कामगारांनो एक व्हा ‘ असा नारा डाव्या विचारांचा आद्यजनक कार्ल मार्क्स यांनी दिला होता. त्याचा सामाजिक व सांस्कृतिक आशय अतिशय व्यापक आहे. कामगार व कष्टकऱ्यांच्या हाती सत्ता आली पाहिजे हा त्याचा अन्वयार्थ होता. कामगार चळवळीचा इतिहास पाहिला तर हातात सत्ता आले असेल तरच पक्ष अथवा विचार वाढतो हे विधान अर्धसत्य असते हे दिसून आले आहे.सत्ता नसताना सुद्धा तो वाढू शकतो प्रभावी ठरू शकतो.राजकारणातील पर्यायी शक्ती ठरू शकतो. हाही इतिहास आहे .विचार वाढवण्यात ,पक्ष वाढविण्यात व्यक्तीचे योगदान निश्चितच मोठे असते. पण विचार आणि पक्ष हे दोन्ही नेहमीच व्यक्ती पेक्षा मोठे असतात. याकडे दुर्लक्ष होता कामा नये.चळवळीतील व्यक्तिवाद नेहमीच चळवळीला हानिकारक असतो. म्हणूनच केवळ इतिहासाच्या स्मरणरंजनात कामगार चळवळीने अडकून पडून चालणार नाही. तर आजचे आजचे अस्वस्थ वर्तमान ध्यानात घेऊन भविष्यात आपण कुठे व कसे असले पाहिजे याची दिशा निश्चित केली पाहिजे. त्याचा राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक अंगाने विविध रचना कामगार चळवळीच्या धुरीणांनी करण्याची गरज आहे. कारण अंतिम मुद्दा भांडवलशाहीच्या चलतीच्या काळात कामगार संस्कृती विकसित करण्याचा आहे. शेवटी ‘ संपत्ती ही श्रमातूनच निर्माण होत असते ‘ हे श्रमसंस्कृतीचे सार्वकालिक सत्य आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली तेहतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.)

यावर आपले मत नोंदवा