प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८५०८ ३०२९०)
डॉ.तारा भवाळकर हे नाव गेले जवळजवळ अर्धशतक मराठी साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती,नाटक अशा विविध क्षेत्रात सुपरिचित आहे.त्यांना नुकताच “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार ” जाहीर झाला आहे.रुपये एक लाख आणि स्मृतिचिन्ह असे स्वरुप असलेला हा पुरस्कार मराठी साहित्य – संस्कृती क्षेत्रामध्ये अतिशय मानाचा मानला जातो. हा पुरस्कार जाहीर करताना निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी म्हटले आहे,” लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ.तारा भवाळकर हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे असे व्यक्तिमत्व आहे.लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. परंपरागत अशी जी स्त्रीची प्रतिमा समाजात रूढ झाली होती त्यामागील पुरुषी दृष्टीकोन त्यांनी अभ्यासाअंती विशद केला.या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.” डॉ. तारा भवाळकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा.
१ एप्रिल १९३९ या दिवशी जन्मलेल्या ताराबाई आज वयाच्या ८३ व्या वर्षीही लिखाणापासून समाजमाध्यमांपर्यन्त सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात.गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने कार्यरत आहेत. अलीकडे जवळच्या व्यक्तीच्या निधना पासून ते प्रकृतीच्या लहान-मोठ्या तक्रारीपर्यंत अनेक आघातांना ताराबाई सामोरे जावे लागले. या साऱ्याचा त्या कमालीच्या सकारात्मकतेने मुकाबला करतात. साहित्य,लोकसाहित्य ,लोकसंस्कृती,नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड पोसला आहे. त्यामुळे एक प्रकारची कमालीची सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात नेहमी दिसून येते असं मला वाटतं.
डॉ.तारा भवाळकर यांची मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रा पर्यंतचा संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक , भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक ,साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक , मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका,एक कसदार वक्त्या अशी विविधांगी ओळख महाराष्टाला आहे. ज्यांच्याशी बोलून, संवाद साधून, ज्यांना ऐकून आपल्याला वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत झाल असं वाटावं असं ज्ञानवंत,प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.तारा भवाळकर.मी ते गेली पस्तीस वर्षे अनुभवतही आहे. त्यांच्या लोभस व समोरच्याला आपलंस करणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे त्या सर्वार्थाने ज्येष्ठ – श्रेष्ठ असूनही त्यांच्याशी ‘भवाळकर मॅडम ‘ पेक्षा ‘ ताराबाई ‘ म्हणून बोलणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या ताराबाईंशी बोलतांना बोलणाऱ्याला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटत असतोच. पण त्याचे दडपण त्याच्यावर येऊ न देण्याची अनोखी शक्ती ताराबाईंकडे आहे.म्हणूनच नवोदित कवी,नाटककार,कलावंत,दिग्दर्शक,कार्यकर्ते,रसिक असे सर्वजण त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतात.त्यांच्याकडे बघून बरच काही शिकू शकतात.तसेच नामवंत मंडळीही त्यांच्याकडे नेहमी येत असतात.सांगलीची नाट्यपंढरी ही जुनी ओळख आहेच.तसेच सांगलीत ताराबाई राहतात हीही एक महत्वाची ओळख आहे. साहित्य,नाट्य,चित्रपट,सामाजिक,सांस्कृतिक, वैचारिक अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आली तर त्या व्यक्तीला ताराबाईंना घरी जाऊन भेटल्याशिवाय कृतार्थ वाटत नाही हे वास्तव आहे. ‘तारा भवाळकर ‘ या नावाबरोबर जोडूनच एक कर्तृत्वसंपन्नतेचा आदर, संशोधकाची तपस्या , मायेची पाखर , आपुलकीची जाणीव येत असते. ताराबाईंचा स्नेहपरीवार राज्य,देश,विदेश असा सर्वत्र पसरलेला आहे. त्यांना प्रत्यक्ष न भेटता त्यांची केवळ पुस्तके वाचून त्यांच्यावर आदरयुक्त प्रेम करणाऱ्या वाचकांची संख्याही मोठी आहे.
ताराबाईंनी १९५८ ते १९७० या काळात माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केले. १९७० ते १९९९या काळात सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम केले. पदवी-पदव्युत्तर व विद्यावाचस्पती विद्यार्थी -विद्यार्थिनींना सतत मार्गदर्शन केले.
‘ मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण : प्रारंभ ते १९२० ‘ या त्यांच्या पीएचडी प्रबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार म्हणून गौरवीले गेले होते.लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर अनेकदा प्रवास केला.अनेक विद्यापीठांच्या विविध समित्यांवर तज्ञ म्हणून काम केले.अमेरिका व इंग्लंड येथील विद्यापीठातही त्यांनी साहित्य विषयक चर्चासत्रात मांडणी केली आहे. मराठी विश्वकोष ,मराठी वाङ्मयकोष, मराठी ग्रंथकोष,मराठी समाजविज्ञान कोष, मराठी चरित्र कोष अशा विविध संदर्भ ग्रंथासाठी त्यांनी लेखन केले आहे. मराठी विश्वकोशाच्या लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादकही होत्या. अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.शेकडो चर्चासत्रे व हजारो व्याख्याने दिली आहेत. राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषदात सहभाग घेतला. लोकसंस्कृतीच माहेरघर असलेल्या ताराबाई हे व्यासंगाच दुसरं नाव आहे असं म्हंटल तरी वावग ठरणार नाही. कारण त्या ज्या सहजपणाने खान्देशातील लोकगीतांवर बोलतात त्याच सहजपणे मार्क्सच्या गतिशील भौतिकवादावर बोलतात.कोणत्याही विषयाची अद्यावत किमान माहिती त्यांच्याकडे असते.
ताराबाईंचा व माझा स्नेह गेल्या पस्तीस वर्षाचा आहे.हे नाते कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या घरी अनेकदा होणाऱ्या गप्पा असोत ,भेटी असोत.कधीही गेलो तरी बोलतांना बेसनाच्या लाडूपासून चिवड्यापर्यंत काहीतरी खायला नक्की मिळणार याची खात्री असतेच.त्या खाण्याच्या डिशमधून आणि कॉफीच्या मगातुन ताराबाईंची सारी ममता भरून वहात असते.
त्यांच्याबरोबर मी असंख्य कार्यक्रमात सहभागी झालो आहे. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी एक तब्बल आठ तासांची मुलाखत आकाशवाणी सांगलीमध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती.तसेच ‘ प्रातिभसंवाद ‘ या पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांनी डॉ.रा.चिं.ढेरे ते उमा व विरूपाक्ष कुलकर्णी आदींच्या घेतलेल्या मुलाखती आहेत.तसेच त्याच पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांची मी घेतलेली तब्बल दीडशे छापील पानांची मुलाखतही आहे. ताराबाईंना मिळालेल्या या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिज्ञासूंनी ती जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत जरूर वाचावी असे आवर्जून सुचवावेसे वाटते.
ताराबाईनी ललित, लोकसाहित्य, संशोधन, वैचारिक, कथा, चरित्र ,व्यक्तिचित्रे अशी बहुत स्वरूपाचे लेखन केले. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला ‘ या दीर्घ कवितेचा अनुवाद त्यांनी केला. यक्षगान आणि मराठी नाट्य ,लोकनागर रंगभूमी ,मिथक आणि नाटक ,लोकसंचित, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर ,मराठी नाटक :नव्या दिशा नवी वळणे, तिसऱ्या बिंदूच्या शोधात,लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा, लोकांगण, मरणात खरोखर जग जगते, नाट्याचार्य खाडिलकर अशी त्यांची अनेक पुस्तके मराठी साहित्य प्रांतात अतिशय महत्त्वाची आहेत.डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या बरोबर त्यांनी लिहिलेले ‘ महामाया ‘ पुस्तकही फार महत्वाचे आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी संजय पाटील यांनी ताराबाईंना आग्रह करून त्यांच्याच काही कथा त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतल्या. ताराबाईच्या आवाजात या कथा ऐकणं हा एक विलक्षण अनुभव पडतो. या कथा यूट्युबवरही आहेत. ‘तारा भवाळकर – जुन्या तरी नव्या कथा’ या नावाने सर्च केलं की त्या कथा ऐकता येतात.
ताराबाईना यांच्या लेखन व संशोधनाबद्दल महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि. म।गोखले पुरस्कार ,मसाप गौरव पुरस्कार ,पुणे नगर वाचनालयाचा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉ.अ.ना.प्रियोळकर पुरस्कार ,सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा रत्न शारदा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विशेष सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचेही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने मी पूर्वी एकदा व्यक्त केलेले मत पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त करतो. ते म्हणजे डॉ.तारा भवाळकर यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव झाला पाहिजे.खरेतर ताराबाईंसारख्या ज्येष्ठ विचारवंत ,संशोधक लेखिकेला हा सन्मान यापूर्वीच मिळायला हवा होता. अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा त्यांचा पिंड नव्हता व नाही. आता सर्वसहमतीने अध्यक्ष निवडीची पद्धत सुरु झाली आहे.त्यामुळे साहित्य महामंडळ व संबंधित संस्थानी यावर्षी ताराबाईंची एकमताने निवड करून राहून गेलेली उणीव भरून काढावी असे वाटते. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी साहित्यात संशोधन व लेखन स्वरूपाची चाळीसावर पुस्तकांच्या रूपाने सातत्यपूर्ण सकस भर घालणाऱ्या डॉ.तारा भवाळकर या वर्तमान महाराष्ट्रातील अग्रक्रमावरील विदुषी आहेत यात शंका नाही. अशा या थोर विदुषी डॉ.ताराबाईंना ” पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवन गौरव पुरस्कार” जाहीर झालाबद्दल पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन व भरभरून शुभेच्छा..!

यावर आपले मत नोंदवा